Korigad

भटकंती : कोरीगड ट्रेकिंग.


…..मुसळधार पाऊस ,वेगाने धावणाऱ्या गाड्या,रेनकोटच्या आतून भिजलेले कपडे,थंडगार वारा आणि गाडीवर बसलेले तरुण आज वेगळेच दिसत होते….. रोज ए.सी.त बसून काचेतून निसर्ग बघणारे ,कॉफी मशीनच्या इंधनावर चालणारे,कप्प्यात पडलेल्या कँमेऱ्याला काय स्कोप मिळतोय का ते शोधणारे आता   मोकळ्या ऑक्सिजनवर फिदा झालेले…..आज फारच थंडी आहे ना, आज किती टास्क आहे ,झाला ना उशीर ,किती हा चिखल, कसले ट्रेफिक काही तक्रार न करता चमू कोरीगडला रवाना होत होता…निवांतपणे…

गड कसा नवीन असला कि फिरायला अजून मजा येते कोलंबसला कसा भारत सापडल्यावर आनंद झाला असेल तसा आनंद होतो एखाद्या गडावर कुठे तरी कोपयात मंदिर किंवा तोफेचे अवशेष मिळाल्यावर…त्यामुळे नवनवीन गड शोधणे आणि तिकडे कूच करणे हा आमच्या ग्रुपचा छंदच…

लोहगड,तुंग,विसापूर नंतर आता कोरीगडचं नंबर होता…असाच एक मित्र नाव सांगत आला गुगल केले आणि तो गडाचा सुळका साद घालू लागला मग ठरले गाड्या निघाल्या टाक्या फुल्ल केल्या खायला पिशव्या भरल्या आणि रेनकोट घालून पुण्यातून लोणावला मार्गे सकाळ सकाळी थेट धूमकेतू…

पुणे ते लोणावला मस्त बाईकिंग करून पुढे टायगर फॉल ला जाताना लोणावळ्यात थोडे ट्रफिकमधून कसरत करत बाहेर पडलो आणि सुरु झाला दाट धुक्यातील रस्ता जाम धुके मस्त पाऊस गाडी चालवणारा खरंच दर्दी हवा नाहीतर आजूबाजूला दरडी आहेतच… [आज काल या रस्यावर मद्यपान करून धिंगाणा घालायचे प्रमाण फार वाढले आहे राग येतो कचरा बाटल्या आजूबाजूला फेकून धिंगाणा करत जाणाऱ्यांचा.]

मजलदरमजल करत आम्ही एका फाट्यावर पोहचलो बरोबर नाक्यावर चहाचे दुकान आहे तिथून एक रस्ता तुंग किल्ल्या कडे तर दुसरा रस्ता कोरीगड कडे जातो…मागे तुंग किल्ल्यावर आलेलो तेंव्हा तिथे चहाची टपरी होती आता मस्त दुकान झाले होतो…पर्यटनस्थळ विकास J ..तिथेच कटिंग मारून पुढे निघालो अँम्बीव्हँली कडे तिथून पण रस्ता आहे गडावर जायला पण आत जाऊ देत नाही गेटवरच मागे फिरून पुढे पेठ शहापूर फाट्यावर पोहचलो…पाहून थोडे आश्यर्च वाटले आम्हाला वाटलेले कि फक्त आम्हालाच हा किल्ला माहित आहे आणि फार तुरळक गर्दी असेल पण फाट्यावर किल्ल्यावर गेलेल्या लोकांचे पार्किंग होतो ४-५ कार,३-४ बस -५-६ बाईक इतके पब्लिक होते पार्किंगचे पैसे देऊन गाड्या पार्क केल्या आणि निघालो…

कोरीगड

रस्ता मस्त सोपा आहे काही काही ठिकाणी आम्ही अवघड शॉर्टकट मारले तेवढेच थ्रील….हिरवागार  गर्द झाडीनं वसलेला किल्ला पाऊस आणि धुके यांमधून डोकावणारा सूर्य मधूनच घसरणारे बूट…अशा वातावरणात आम्ही किल्ला सर केला तसा किल्ला फार काही मोठा नाही तसेच आमच्या जवळ किल्ल्याचा नकाशा होता मग बरेच स्पॉट शोधायला त्याची फार मदत झाली तसेच काही काही ठिकाणी शिवप्रेमींनी बोर्ड पण लावलेले आहेत भारी..स्थळ दर्शक असे बोर्ड सर्व किल्ल्यावर हवेत..

किल्ल्यावर दोन तळी आहेत महादेव मंदिराच्या मागे त्याला महादेव तलाव म्हणतात त्या दोन तलावांमधून एक मस्त रस्ता जात होता आम्ही ब्रीज सारखा वापरून तो तलाव क्रॉसिंग स्पर्धा केली.तलावाचे पाणी काटा किर्रर्र गार होते….पाय टाकल्यावर बर्फात पाय पडल्या सारखे झाले,एकमेकांना थोडे भिजवून मस्तीखोर मित्र शांत झाले….

किल्ल्याच्या वरून अम्बी व्हेली चे दर्शन होत होते..काय यार एवढ्या आत ही सिटी कशी वसवली असेल याचे आशर्य वाटल्या शिवाय राहत नाही….पण आता पैसे, किंमत, महाग ,सहारा,नेते ,ऐश हे शब्द आणि या सर्व गोष्टी इतक्या उंची वरून फार छोट्या वाटत होत्या… वाटेत एक लहान पटांगण आणि गणपती मंदिर पण लागते…५-६ तोफा आहेत किल्ल्यावर…

नकाशा :

कोरीगड नकाशा

किल्ल्यावर जाताना वाटेत पाण्याचे टाके व गुहा लागतात तेथे विश्रांती घेवून पुढे सरकलो…किल्ल्यावर माकडे पण फार आहेत पण बिचारी त्रास बीस देत नाहीत त्यांची मस्ती केमेरा बद्ध करण्यास काही प्राणीप्रेमी टपूनच बसलेले…धुक्यामुळे फोटो काढण्यास त्रास होत होता पण मधून सूर्याची उघडीप आल्यावर फोटो टिपून घेत होतो…

किल्ल्यावरून लहान लहान धबधबे वाहत होते..वाऱ्याने त्यांचे तुषार अंगाला थंडीची जाणीव करून देत होते असे सगळे वातावरण..

कोरीगड माथा

किल्ल्यावर मोठे पटांगण आहे तिथे मस्त स्टंटबाजी करून फोटो काढले आणि मग भूक लागल्यावर पिशव्या बाहेर आल्या आणि मग झडप मारून हाताला येईल ते खाल्ले…नंतर मोर्चा निघाला कोराई मातेच्या मंदिराकडे याच मंदिरामुळे गडाचे नाव कोरी गड पडले आहे या मंदिरासमोर ७ फुट उंचीची प्राचीनतम दीपमाला आहे..हे प्राचीन मंदिर आहे पण इथे रात्री आल्यास झोपण्याची पण सोय होते इतके ठीकठाक आहे.. देवीला वंदन करून आम्ही तोफा शोधायला निघालो नकाशावरून तोफा शोधल्या फोटो झाले आणि किल्ल्यावर वेढा मारून कमांडो परतीच्या मार्गाला लागले…

कोरीमाता मंदिर

.वाटेत मूड आला आणि लोणावळ्याच्या धबधब्याला अनपेक्षीत भेट दिली तिथे पायऱ्यांवर माणसांचा धबधबा इतका होता कि पाणी कोठे आहे ते शोधावे लागत होतो..आयडिया सी काही कमी न्हवती आम्ही त्या धबधब्याच्या मागे एक ओढा पकडला आणि त्यावरून वाट शोधूत एक आत धबधबा शोधला तिथे मनसोक्तपणे संध्याकाळचे अभ्यंगस्नान करून सिंथोल फ्रेश झालो…आणि बेस्ट ट्रीप ची सांगता करत परत पुण्याला निघालो…

…..परत तीच रस्त्याची नशा …धुक्याची मजा..पावसाची सर…कडक कटिंगचा घोट…गरम कांदा ,बटाटा भाजीवर चाप मारत सुसाट वेगाने परत मार्गस्थ झालो परत त्याच ट्रेफिक जाम वाटेवर आता काही वाटत न्हवते…. फ्रेशनेस अंगात दाबून भरला होता…प्रोब्लेम्सचा ज्वालामुखी काही वेळासाठी का होईना सुप्त पडला होता…त्याच गोष्टी,तीच तीच झाडे,पावसात भिजणारी गर्दी आता नवीन वाटत होती…

खरंच..कधी कधी रखरखत्या जमिनीला एखादी थंडगार वाऱ्याची झुळुकही फार काही देऊन जाते…..

-MJ [पुनर्प्रकाशित]

Advertisements