Travel

भटकंती : लाडघर बीच : निसर्गरम्य नयनरम्य कोकणी बीच


दापोलीच्या जवळच १० किलोमीटरवर एक मस्त एकांतात रिमोट बीच आहे.. निखळ समुद्रकिनारा आणि आजूबाजूला जंगल अगदी इंग्रजी “U” शेप असलेले….. लाडघर बीच म्हणजे सुट्टीचे नवे हॉट डेस्टीनेशन झालेले आहे …

कोकण किनारपट्टीवर अनेक बीच च्या रांगा आहेत…दापोली शहराच्या जवळपास ही भरपूर मस्त बीच आहेत…रोजच्या धावपळीच्या दगदगीच्या गर्दीच्या जीवनातून विश्रांती घेवून एका शांत निवांत निर्मनुष्य ठिकाणी निर्भयपणे वावरताना खरोखर शरीरातील आणि मनातील थकवा लांब पळून जातो….फार कटकट करून एखाद्या बीच वर पोहचावे तर तेथे ही लोकांची गर्दी वॉटर स्पोर्ट्स करून थकून जाणे मग काही ट्रीप करून अजून थकून जातो याला पर्याय म्हणून साध्या ऑफ सिझन,रिमोट लोकेशन्स,नवीनतम ठिकाणे हेच जास्त पसंतीचे ठरत आहेत…असेच सध्या लोकांच्या पसंतीस उतरलेले लाडघर बीच सर्व बेसिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनत चाललेले आहे तरीही त्याचा मूळ ढंग गुण कायम ठेवून…हे विशेष!!

लाडघर बीच : रेड सी

लाडघर बीच : रेड सी

तर कसे जायचे येथे:

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात….मुबई गोवा हायवेला लागून दापोलीत प्रवेश करणे…दापोली मध्ये नाक्यावर पोलीस चौकीजवळून रस्ता आत जातो तो पकडावा आणि १० किलोमीटर च्या अंतरावर लाडघर…मस्त रस्ता आहे …नंतर एका बाजूला बरचसे बोर्ड लावलेले दिसतात लाडघर हॉटेल्सचे….तेथून कच्चा रस्ता पकडून आत येणे …रस्ता कच्चा असला तरी आत १६ सिटर बस ही आरामात जाते..येथे गुगल नकाशा काका पण काम करायचे थांबतात….मुख्य रस्ता न सोडता पुढे गेले की गर्द झाडीतून रस्ता जातो…..जणूकाही आपण बीच च्या जवळपासही नाही आणि जंगलातून जात आहे असे वाटते….गाडी अचानक वळण घेते आणि आपल्या डोळ्यासमोर आकस्मित पणे सुंदर बीच येते…त्या रस्तावर अनेक घरात घरगुती हॉटेल्स ची सोय आहे सगळी घरे एकदम सी फेसिंग…किनारा आणि घरे यांच्या मधून आपला रस्ता जाते…

काय पाहाल :

लाडघर हा एक पवित्र बीच मनाला गेला आहे..या बीच चे वैशिष्ट्य म्हणजे इथली बीचची रेती लाल आहे त्यामुळे येथे पाण्याचे लाल रंगात रिफ्लेक्शन दिसते म्हणून या बीचच्या भागाला लाल समुद्र असेही म्हणतात…बीच स्वच्छ आणि सुरेख आहे लांबच लांब समुद्र किनारा यावर मस्त फिरायला पाण्यात पोहायला एक नंबर मजा येते आणखी म्हणजे जास्त गर्दी दंगा नाही सगळे वातावरण शांततामय….

मध्ये बीच आणि आजूबाजूला दाट जंगल गर्द झाली नारळाच्या बागा…एकीकडे समुद्र दुसरीकडे जंगल आणि मध्ये किनाऱ्यावर आपण असे झकास वातावरण…..

बीच वर रंगलेला सामना

बीच वर रंगलेला सामना

आम्ही किनाऱ्यावर मस्त क्रिकेट खेळला…नंतर स्वीमिंग केले..सनसेटचे फोटोसेशन झाले……रात्री किनाऱ्यावर गाण्यांची मैफिल रंगली….तसेच किनाऱ्याजवळ गार वाऱ्यात शेकोटी पेटवून काही ग्रुप्स घोळका करून त्या भोवती बसलेले…..

सकाळी उठून फ्रेश हवेत किनाऱ्यावर फिरत होतो…किनाऱ्यावर सकाळी काही वेळ तारा मासा स्टार फिश ही आढळून येतात…समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला डोंगरावर दत्ताचे जुने मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला देवीचे मंदिर आहे…आम्ही चालत दत्ताच्या मंदिराकडे निघालो जवळच डोंगर पायथ्याजवळ नवनवीन शैवालखडक आणि तशा वनस्पती दिसल्या त्यांचे फोटो काढून डोंगर चढला….

डोंगरावर जुने लाकडी मदिर आहे….मंदिरासमोर लाकडी मंडप आहे …..तेथे दर्शन घेवून मंदिराच्या मागील बाजूस आलो तेथून समुद्राचा मस्त व्हू होता …फोटोसेशनला स्कोप भरपूर….

शैवाल जन्य वनस्पती

शैवाल जन्य वनस्पती

तेथून मग आजूबाजूच्या बीच ला भेट देवू शकत जसे की हरणे बीच ,महाड बीच ,सुवर्ण दुर्ग किल्ला, अंजीर्ले बीच,करडे बीच .. पण तसे सगळे बीच सारखेच आहेत..

लाडघर च्या जवळच करडे  बीच आहे..बीच थोडे खडकाळ आहे जवळ मोठे हॉटेल्स आहेत..ठीक आहे…थोडे लांब गेले की हरणे बीच येते…तेथे राहण्याची काही सोय नाही पण टाइमपास करायला मस्त ठिकाण आहे…जवळच समुद्रातील सुवर्ण दुर्ग किल्ला आहे किल्ला लहान आहे तेथे मासेमारी करणाऱ्या बोट आपणस सोडू शकतात…हल्ली तेथे किल्ल्यावर हॉटेल चालू झाले आहे अशी बातमी कानावर आली आहे…अंजीर्ले बीच पण मस्त आहे…तसे वॉटर स्पोटर्स साठी महाड फेमस बीच आहे तेथे सिझनला अनेक खेळ असतात आणि खास किनाऱ्यावर चालवायच्या मोटार बाईक ची पण सोय आहे…

काही हॉटेल्सचे पत्ते :

  • पालवी हॉटेल,लाडघर,दापोली,रत्नागिरी ,महाराष्ट. :९६७३१६८८५५ :९६३७१८५४३४
  • चैतन्य निवास लाडघर :९८२३९४८५२० : ९८२३९४७५५१

लाडघर बीच खासियत :

लाडघर हा सुंदर बीच नैसर्गिक विविधता व रिफ्रेशिंग बीच असून हा “तामस तीर्थ” या पवित्र नावाने ही ओळखले जाते.यामुळे येथे स्नानासाठी धार्मिक लोक ही येतात..जवळच नदी समुद्राला मिळते…बीच चा काही भाग शंख शिंपले,दगड लाल रेती यांनी भरलेला आहे..सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो…लाल रंगाच्या अनंत छटा संपूर्ण किनाऱ्यावर पडतात…

बीच वरील दोन पुरातन मंदिर पैकी एक शंकराचे मंदिर आहे वेलेश्वर या नावाने ओळखले जाते तर दत्ताचे मंदिर डोंगरावर आहे …आपण १५ मिनटात मंदिराकडे दत्त पोहचू शकतो….याच डोंगरामुळे करडे बीच आणि लाडघर बीच हे वेगळे झालेले आहेत….बीच च्या एक टोकाला खडकाळ रेती  तर दुसऱ्या टोकाला मऊ माती असे मस्त  ट्रान्झिशन पाहायला मिळते.

नकाशा :

दापोलीकडे

दापोलीकडे

खानाखजाना :

लाडघर आणि दापोली म्हणजे मासे खाणाऱ्यांची पर्वणीच….सुरमई,पापलेट,झिंगे,काय काय आहे ते मासे….

आम्ही दापोलीला  “सी वूड हॉटेल’ मध्ये जेवण केले पंजाबी व्हेज नॉनव्हेज,मासे अशा जेवणासाठी मस्त हॉटेल आहे हे…

लाडघारला आपल्याला कोणते मासे हवे याची अगोदर कल्पना ज्या हॉटेल मध्ये थांबलोय त्यांना द्यावी लागते मग ते दापोलीवरून हवे ते मासे व समान ,बाटल्या विकत आणतात…

आम्ही रात्री पापलेट माशाचा प्लान केला आणि मग थाळीत पापलेट ,तांदळाची भाकरी ,झिंगे यावर तुटून पडलो….काहींनी ओपनर मागवले….जेवण एकदम झकासच…..

माशाचा बेत..

माशाचा बेत..

नंतर महाड बीच वर शिंदे नावाची फेमस खानावळ आहे दत्ताच्या मंदिराजवळ मेन गावाच्या चौकात..तेथे काय जेवण होते म्हणता…तळलेले सुरमई मासे...गरमागरम चपाती, काटा किर्र रस्सा ,सोलकढी……आत्मा तृप्त…..

…..महाड बीचला किनाऱ्यावर टपऱ्या आहेत तेथेही तळलेले मासे एक नंबर मिळतात…

….समुद्र किनाऱ्यावर लाटाकडे पाहत लाकडी बेंच वर किंवा आराम खुर्चीवर बसून चहा, पोहे यांचा आस्वाद नक्की घेणे..चहा अमृततुल्य लागला नाही तर विचारा……..उत्कृष्ट जेवणाबरोबरच वातावरण ही सुंदर असलेकी जेवणाची गोडी दसपटीने वाढते यात नवल कोणते.

….बीच वरून जाऊन आल्यावर मन एकदम शांत प्रसन्न निर्मल होऊन जाते…कौटुंबिक सहल असो वा मित्राची पार्टी किंवा जोडीदाराबरोबर रिलॅक्सेशन असो….सेलिब्रेशन करायला लाडघर सारखी अप्रतिम जागा दुसरी नाही…..आपणही आता नकीच भेट देऊन या… 🙂

हा सागरी किनारा...

हा सागरी किनारा…

धन्यवाद–MJ 🙂

Advertisements

भटकंती :गोवा रिटर्न २०१३.


…..अर्धा गोवा पादक्रांत…ना…गाडीक्रांत करून झाल्यावर……राहिलेल्या गोव्यावर मार्गक्रमण करण्याचा इरादा पक्का झाला आणि चालू झाला….मिशन गोवा २०१३…परत तीच तयारी…तीच मंडळी…पण नवा प्लान….नवी ठिकाणे….नवीन प्रवास…..

………एक नंबर यार ……अजून गोवा काही जात नाहीये आठवणीतून…..डोक्यातून….मनातून….

….अनेक हुशार लोक एकाच वेळी एकाच प्लान करत असले तर परफेक्ट प्लान कधीच होत नाही…..यावेळी प्लानच केला नाही …जे होईल ते होईल,आली लहर केला कहर “…असा आगळावेगळा  ढोबळा प्लान इनोव्हेटिव्ह ट्रीप साठी फिक्स झाला..

…….ग्रुप कसा सगळ्या प्रकारच्या प्राण्यांनी भरला साला की कशी  एक जान येते…..एखादा जरी चुकला की ट्रीप त्याला मिस करण्यात जाते….. म्हणून ऐन शेवटच्याक्षणा पर्यंत सगळ्यांना तयार करून त्यांचे बुकींग करण्यात बुजुर्ग खेळाडूंनी मोलाची कामगिरी निभावली…आणि  शेवटी सगळे पात्र तयार झाले……..पुणेकर म्हणजे काम कसे परफेक्ट पाहिजे असा थाट ……यावेळी गोवा शासकीय वाहन कदंबा बस ने प्रवास करायचा नवा अनुभव होता…महाराष्ट्र शासकीय बसचा अनुभव असणारे आम्ही थोडे लोड मध्ये होतो पण बस मस्त होती…..बॉस फिल्म बस मध्ये लागली आणि “अपनेको क्या बस पाणी निकालना हे“.. चालू झाले …मग बस कर बाबा अशी अवस्था झाली…

……..मध्यरात्रीची वेळ शांत बस प्रवास मधेच बस थाबली…आजूबाजूला लोकांचे घोषणाबाजी,आरडाओरडा,सगळी वाहने ठप्प…समोर धूर येताणाचे चित्र..बस्.काही कळायला मार्ग नाही आणि बसला जायला पण मार्ग नाही अशी केस…कोणीतरी म्हंटले की समोर उस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे आणि त्यांनी बस पेटवली..झोपलेले पब्लिक ताड दिशी..जागे झाले…मागून पोलीस सायरन चा आवाज…मिल्ट्रीच्या पोलीस फलटण….हेल्मेट आणि काठ्या घेऊन रस्त्यावर आल्या …आम्ही खिडकीच्या काचेतून बाहेर पाहतोय…असे थ्रिलींग वातवरण..मी दोन सीट मध्ये खाली बसलो आणि आजूबाजूच्या लोकांना घटनेचे थेट वर्णन सांगायला चालू केले…..तेवढेच वातावरण निर्मिती… 😀

…..झाले…पोलिसांनी रस्ता मोकळा केला गाडी पुढे गेली आणि आम्ही मोकळा श्वास सोडला….डोळे उघडले ते थेट पणजी बस स्थानकावर…पहिल्या दिवसाचे बुकिंग झालेले तिथे जाऊन आडवे झालो….सकाळी गाड्या घेतल्या ..बुलेट..अएव्हेंजर..अँक्तीव्हा…सुइंग करून वाघात्तोर बीचच्या दिशेने……

…..गाडी चालवली तर ती गोव्यातच…दोन्ही दिशेने नारळाची झाडे….मोकळा रस्ता…..मस्त फ्रेश वातावरण…झकास गाड्या…..फील हो….जिंदगी….

वागातोर बीच गोवा

वागातोर बीच गोवा

वाघातोर बीच तसा खडकाळ ..डोंगरावर गाड्या लावून चाललो खाली किनाऱ्याकडे….परदेशी पाहुणे पहुडलेले…काही पोहत होतो..थोडे फोटो काढून काहींनी अपलोड केले….गावाला कळायला पाहिजे ना की ही कार्टी गोव्यात आहेत म्हणून… मग एक ठिकाणी दगडावर बसलेलो गप्पा मारत …मधूनच काय झाले कपडे काढून सगळे जण पाण्यात…थंडगार पाणी…कपाळात…पण गोव्यात आल्याच्या खुशी पुढे पाण्याची काय मिजास…एक नंबर पाणी होते….फ्रेश एकदम…पूर्ण आत पर्यंत सपाट… एकाच लेव्हलवर बीच होता..असा बीच पोहायला उत्तम…एकाबाजूला लाटा आत जाणाऱ्या दगडाच्या सुळक्याला आदळत होत्या…काही जण आत खोल पाण्यात पोहायला गेले..आम्ही परदेशी पाहुण्याबरोबर पाण्यात मजा करत होतो…मधूनच एक जण फोल्टर घेऊन आला…..त्यावर आडवे होऊन पाण्याच्या लाटेबरोबर पोहायची मजा सगळ्यांनी जाम घेतली…एकदम फॉरेनर्स झाल्यासारखे वाटत होते….जाम भूक लागलेली..जवळ चे मस्त हॉटेल पकडून माशावर ताव …

सुरमई मासे

सुरमई मासे

…पाल्म ग्रूव्ह रेसोर्ट नावाच्या  मस्त हॉटेल मध्ये हे मासे खाल्ले..ताजेतवाने…

[पत्ता:  palm groove resort,vagator beach,deulwada,bardez, Goa: 98822142069: +91 832 2274388]

…बस्….सगळ्यांचे आवरून निघालो केंडोलीम बीचला…लांबच लांब  बीच…सर्वत्र कडेला पहुडलेले पुस्तक वाचणारे पर्यटक…अशा अवस्थेत काही जास्त लवकर पुस्तक वाचून होते की काय असा विचार ही माझ्या बालमनात आला…बीच इतके स्वच्छ नाही गायी फिरत होत्या इकडे तिकडे…..परदेशी ललना त्यांचे फोटो काढत होत्या आणि आम्ही त्यांचे…..कुणाचे काय तर कुणाचे काय…

कॅन्डोलीम बीच गोवा

कॅन्डोलीम बीच गोवा

…..संध्याकाळी गोवा क्रुझ वर जायचा प्लान ठरला…फार ऐकलेले त्याबद्दल…काही मुलांनी गोव्याचे एक दोन डान्स केले आम्ही नावेतून फोटो काढले..ठीक आहे तसे …एवढे काही खास नाही…आणि उद्या काय करायचे ते ठरवायला जोश फिल्म वाल्या फेमस चर्च वर जाऊन बसलो…झाला उद्या थेट पालोलीम बीच….

..टाक्या फुल्ल…..नॉर्थ गोव्याच्या एक टोकावरून साउथ गोव्याच्या शेवटच्या टोकाकडे…रस्ता हायवेवरील पकडला…..मग काय मस्त घाटातून…फिरत…गाणे म्हणत…..गाड्या सुसाट….या रस्त्यावर गाडी चालवणे हे गाडीवानाचे भाग्य…

….मडगावला कामत हॉटेल मध्ये नाष्टा हाणला…मग पोट भरून….दिल् चाहता है फेम बायकिंग…सगळी गाणी म्हणून टाकली जोरजोरात सगळ्या रस्त्यात….

….मजलदरमजल करत पालोलीम बीचच्या कडेला गाड्या लावल्या आणि एक चमू रूम शोधायला गेला…त्यातील तज्ञ मित्रांनी झकास समुद्र किनारी तीन टेंट बुक केले आणि समोरचा सी व्हू मस्त लाकडी टेंट…सगळे खुश….वातावरण इंग्लिश….

टेंट

टेंट

..आम्ही वरील डी कोस्टा हॉटेल मध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो…शांत सी फेसिंग स्वच्छ सुंदर तंबू खोल्या…

[पत्ता: D’costa cottage,palolem,canacona,Goa: http://dcostapalolem.com/:9822385576: 0832 2644056]

….तसे पालोलीम बीच एक नंबर आहे…सगळ्या सोई आहेत…जास्त गर्दी नाही…निसर्गरम्य परिसर…राहायची कमी किमतीत झकास सोय…फ्रेश वातावरण…बोटिंग..हॉटेलिंग..सगळे काही..तरुणाईला खुणावणारे…

…जवळच एक हॉटेल पकडून यथेच्छपणे भोजनाचा आस्वाद घेवून …समुद्रात उड्या मारल्या….तास दोन तास बिनधास्त पोहून झाले…

…एकाची ट्यूब पेटली…चला बोटिंगला..चलो…फुटबॉल घेतला…नाव ठरवली…सगळे पायरेट्स ऑफ केरीबियन मोड मध्ये…नावाडी मस्त महिती देत होता…नावेला एका बाजूला आधारासाठी आडवा बांबू लावलेला मी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती चालू केली तेवढ्यात त्याने डॉल्फिन आले शांतपणे बसा म्हणून मला गप्प केले….समुद्राच्या मध्ये दोन ती डॉल्फिन सुळकी मारत होते….स्मूथ..सोफ्ट..सिंक…रिदम…अप्रतिम….

…..डोंगराला वळसा घालून…सगळे बेचलर एक समुद्रातील बीच कडे निघालो..हनीमून बीच…फोटो निघाले…मग फुटबॉल….टीम पडल्या आणि जो खेळ चालू झाला त्वेषाने..एक एकमेकांकडे स्किल्स वापरून गोल करायसाठी फाईट….खुन्नस रे…जीक्या जिक…काटा किर्रर्र फुटबॉलपटू रे …जणूकाही सगळे आजूबाजूचे जंगल आमचा सामना पाहायला आले आहे…झकास मेंच झाली….एक तास कसा गेला कळलेच नाही….नाव परत किनाऱ्याकडे मार्गस्थ…..

DSC06870

………सूर्य मावळतीला झुकलेला…समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त पाहायला मिळणे या सारखे सुख नाही… बीच वरून थेट सूर्यास्त पाहता येत नव्हता एका डोंगराकडे जायला लागणार होते मग आम्ही पळतच डोंगर गाठला…परदेशी पाहुणे अगोदरच ठाण मांडून बसलेले….एकमात्र आहे यांना कधी कुठे काय करायचे भारी माहित असते…एका दगडावर बसून सूर्याकडे टक लाऊन बसलो….लाटांचे तुषार अंगावर घेत…थंड वारे…शांत वातावरण….स्वतःच्या असण्याची जाणीव….तिथेच दगडावर आडवा झालो….श्वास पूर्णतः खुलून गेलेला सगळेकाही भरून घेत होतो….पेट्रोल पुढच्या एक वर्षासाठी…..नंतर काही न बोलता चालत राहण्याच्या जागेजवळ आलो..आता जेवण….होऊदे खर्च हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेलो ट्रीपला पण जसे पैसे खर्च होत होते तसे काही अर्थतज्ज्ञ व्यक्तींनी ब्रीदवाक्य थोडे बदलून… होऊदे खर्च पण लिमिट मध्ये असे करून त्याची मजाच घालवली…असो…बीचवर पैसे खलास…ए टी एम ४-५ किलोमीटर लांब…..मग रात्री बुलेट काढली…आणि मग थंडगार रस्त्यावरून धडधड करत मस्त बुलेटिंग करत पैसे काढले….एक ठिकाणी हवे ते मासे शोधून त्यातले काही तरी करायला सांगितले आणि खाल्ले…बाटल्या सुटल्या…रात्री किनाऱ्यावर खुर्चीवर बसून लाटा न्याहाळत बरा वाजून गेले…

समुद्र किनार्यावर जेवण

समुद्र किनार्यावर जेवण

…सकाळ झाली…मस्त गुलाबी थंडीत बीचवर फिरायची मजा अनोखीच…..जवळच एक लाकडी पूल होता डोंगराजवळ….मस्त फोटो स्पॉट आहे हा…

…..असे झुलता पूल सारखी मजा….पूल ओलांडून मग एका हॉटेल कडे जाताना रस्ता होता….

ब्रीज लाकडी पूल हॉटेल कडे जाताना

ब्रीज लाकडी पूल हॉटेल कडे जाताना

…..आजूबाजूला तेथे काही मित्रलोक फोटो काढत होते काही पाण्यात अभ्यंगस्नान आवरत होते तर काही अजून रात्रीच्या तंद्रीत.सगळे आपापल्यापरीने एन्जोय करत होते….

…नाष्टा आवरून कयाकिंग साठी ग्रुप सज्ज….खतरा प्लान ठरला…एक दुहेरी आणि दोन एकेरी नाव घेऊन हाताने व्हल्ले मारत ..ग्रुप पाण्याच्या आता घुसला….पहिला व्हल्ले कसे मारायचे हे लॉजिक समजून घेतले मग काय सपासप हात मारत समुद्र कपात आत तीन..नाव निघाल्या…दोन सिंगल…एक डबल…हाताला गोळे येई पर्यंत हात मारत जवळपास आत डॉल्फिन पाहिलेले तेथपर्यंत चमू पोहचला….ग्रेट…आता गेल्यावर लाटा जास्त जाणवत नव्हत्या..शांत पाणी वाटत होते…पुढे तो डोंगर आणि डोंगरापासून जवळ एक मोठा खडक होता त्यामधून लाटा हेंदकाळत होत्या…मध्ये एक वाट तयार झालेली तेथून नाव घालायची मस्ती आली ..एकमेकांकडे डोळ्यानेच पहिले संदेश गेला..नाव वळली मी पहिला पुढे घेतली….

कयाकिंग गोवा

कयाकिंग गोवा

…..दोन दगडांच्या मध्ये…लाटांचा प्रचंड वेग…नाव अस्थिर व्हायला लागली…तेवढ्यात मागे बसलेला मित्र ओरडला…अरे तो दगड पुढे सरकतोय…मी वळतो तर तो खरंच…आमच्याकडे येताना दिसला जणूकाही आमची नाव चिडूनच टाकण्याचा प्लान करून आलेला आहे….मी नाव वळवून घायचे ठरवले पण त्या लाटांमुळे नाव पण लवकर वळत न्हवती..फाटली….जोरदार हात मारत कसेबसे त्या दोन दगडांच्या मधून बाहेर पडलो….हुश…बाकी मित्र तिथेच होते..मागे बघितले तर तो दगड होता तिथेच होता पण नाव हालत असल्यामुळे तो आम्हाला आमच्याकडे येतोय असे वाटत होते….दुसरे मित्र पुढे झाले….परत जायचे काय..नाही बाबा…आमची भागली….ऐका मित्राने दगडाला वेढा मारून…एकदम स्पोर्ट्स लुक देऊन परत आला..आता प्लान…कयाकिंग….सगळे नाव कायाक करत मध्ये आलो आणि एक एक करत कायाक मधून उद्या मारल्या…तसे करायला बंदी होती हे माहित असून…भर समुद्रा मध्ये..चार लोक तरंगत होते…आजूबाजूला विस्तीर्ण समुद्र..लांब दिसणारा किनारा…शुभ्र आकाश…स्वच्छ पाणी..आणि आम्ही तरंगतोय…काय फील…वा….शांत स्वीमिंग करत होतो…मी तर खाली जाऊन स्कूबा डायव्हिंग करता येतंय का ते पाहिलं पण लाईफ जेकेट्स मुळे खाली जाता येत नव्हते…तेवढ्यात लांबून एक नाव वाला येत होता …त्याला वाटले की ….आम्ही अपघात होऊन पाण्यात पडलो आहे की काय..तो एकदम मदत करायला सरसावला पण आम्ही त्याला मुद्दामच उद्या मारल्यात ह सांगितल्यावर भडकला..आणि रागवून परत बोटीत बसायला सांगितल..आम्ही कायाक वर चढायला निघालो..एक जण बसला आणि मी बसणार तेवढ्यात कायाक माझ्या वजनाने पलटी झाली..तो नाव वाला जाम तापला…त्याला शांत करत कसे तरी परत कायाक वर बसलो आणि परत किनाऱ्याकडे निघालो…”पागल है ये लडके” असे काही तरी बडबडत तो निघाला आणि आम्ही आमचा प्लान सक्सेसफुल झाला या आनंदाने एकदम गाणी म्हणत कायक मारत किनारा गाठला…एक समुद्री…प्रवास…एक डेअरिंग…फील..मस्ती….मजा..हशा ..टाळ्या..कला…थ्रील…सगळा अनुभव…घट्ट मनात साठवून ..कयाकिंग ला निरोप दिला…

..शॉवर घेवून..पालोलीम ची रूम सोडली ते जुना गोवा पाहण्यासाठी…..मंगेशीच्या मंदिराबाहेर प्रसन्न वातावरणात आमचे मन शुद्धीकरण झाले..बाहेर थंडगार कोकम सरबत मारला..खरंच शांत आणि पवित्र मंदिर आहे…

मंगेशी मंदिर

मंगेशी मंदिर

…..गाड्या चर्च कडे..गोव्यात तेथे सेंट जोव्हीअर हा जुना चर्च आहे तेथे नेमके त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम होता..फीस्ट म्हणतात त्याला..त्यावेळी तेथील सेंटला पवित्र दिन मानून बाहेर काढून प्राथना होते अशी महिती मिळाली…प्रचंड गर्दी…जवळच्या चर्च बाहेर फोटो मारून ओल्ड गोवा ते पणजी प्रवास चालू केला….

चर्च

चर्च

गोवा कसा गाडी पाठ झाला होता एव्हाना….मस्त फायनल फेरफटका मरून गाड्या जमा केल्या….आणि कदंबा बस् स्थानकावर बस मध्ये स्थानपन्न झालो…परत त्याने “बॉस” लावला..शॉट…शेवटी विनंती करून तो बदलून वॉर छोड ना यार लावला…मस्त कुल फिल्म होता…दमूनभागून आलेलो कधी झोपलो आणि कधी पुणे आले कळलेच नाही….

….बीच नव्हता..खास गाड्या नव्हत्या….परदेशी पर्यटक नव्हते…झकास मासे …समुद्र किनारा…पण नव्हता…तरी आम्हाला अजूनही गोव्यातच असलेल्या सारखे वाटत होते…इतका गोवा इफेक्ट झालेला आमच्यावर….

….किलोभर गोव्यातील ऑक्सिजन फुफुसात ..डझनभर गोव्यातील मासे पोटात….अंगावर चिकटलेले हजारो वालुका कण..हिरवळ पाहून प्रफुल्लित झालेले डोळे….गाड्या मारून सपाटीकरण झालेले पृष्ठभाग….डोक्यात चढलेली मस्त झिंग…प्रसन्न झालेले मन..उत्साहाने सळसळणारे तन….जणू काही गाडी सर्व्हिसिंग करून पेट्रोलची टाकी फुल्ल करून आलेली आहे ….असे आम्ही सगळे परत जोशात तयार झालोय नवीनतम ट्रीप प्लान करायला………यार परत जायचंय गोव्याला….

sunset

sunset

–MJ 🙂

 

भटकंती : कोरीगड ट्रेकिंग.


…..मुसळधार पाऊस ,वेगाने धावणाऱ्या गाड्या,रेनकोटच्या आतून भिजलेले कपडे,थंडगार वारा आणि गाडीवर बसलेले तरुण आज वेगळेच दिसत होते….. रोज ए.सी.त बसून काचेतून निसर्ग बघणारे ,कॉफी मशीनच्या इंधनावर चालणारे,कप्प्यात पडलेल्या कँमेऱ्याला काय स्कोप मिळतोय का ते शोधणारे आता   मोकळ्या ऑक्सिजनवर फिदा झालेले…..आज फारच थंडी आहे ना, आज किती टास्क आहे ,झाला ना उशीर ,किती हा चिखल, कसले ट्रेफिक काही तक्रार न करता चमू कोरीगडला रवाना होत होता…निवांतपणे…

गड कसा नवीन असला कि फिरायला अजून मजा येते कोलंबसला कसा भारत सापडल्यावर आनंद झाला असेल तसा आनंद होतो एखाद्या गडावर कुठे तरी कोपयात मंदिर किंवा तोफेचे अवशेष मिळाल्यावर…त्यामुळे नवनवीन गड शोधणे आणि तिकडे कूच करणे हा आमच्या ग्रुपचा छंदच…

लोहगड,तुंग,विसापूर नंतर आता कोरीगडचं नंबर होता…असाच एक मित्र नाव सांगत आला गुगल केले आणि तो गडाचा सुळका साद घालू लागला मग ठरले गाड्या निघाल्या टाक्या फुल्ल केल्या खायला पिशव्या भरल्या आणि रेनकोट घालून पुण्यातून लोणावला मार्गे सकाळ सकाळी थेट धूमकेतू…

पुणे ते लोणावला मस्त बाईकिंग करून पुढे टायगर फॉल ला जाताना लोणावळ्यात थोडे ट्रफिकमधून कसरत करत बाहेर पडलो आणि सुरु झाला दाट धुक्यातील रस्ता जाम धुके मस्त पाऊस गाडी चालवणारा खरंच दर्दी हवा नाहीतर आजूबाजूला दरडी आहेतच… [आज काल या रस्यावर मद्यपान करून धिंगाणा घालायचे प्रमाण फार वाढले आहे राग येतो कचरा बाटल्या आजूबाजूला फेकून धिंगाणा करत जाणाऱ्यांचा.]

मजलदरमजल करत आम्ही एका फाट्यावर पोहचलो बरोबर नाक्यावर चहाचे दुकान आहे तिथून एक रस्ता तुंग किल्ल्या कडे तर दुसरा रस्ता कोरीगड कडे जातो…मागे तुंग किल्ल्यावर आलेलो तेंव्हा तिथे चहाची टपरी होती आता मस्त दुकान झाले होतो…पर्यटनस्थळ विकास J ..तिथेच कटिंग मारून पुढे निघालो अँम्बीव्हँली कडे तिथून पण रस्ता आहे गडावर जायला पण आत जाऊ देत नाही गेटवरच मागे फिरून पुढे पेठ शहापूर फाट्यावर पोहचलो…पाहून थोडे आश्यर्च वाटले आम्हाला वाटलेले कि फक्त आम्हालाच हा किल्ला माहित आहे आणि फार तुरळक गर्दी असेल पण फाट्यावर किल्ल्यावर गेलेल्या लोकांचे पार्किंग होतो ४-५ कार,३-४ बस -५-६ बाईक इतके पब्लिक होते पार्किंगचे पैसे देऊन गाड्या पार्क केल्या आणि निघालो…

कोरीगड

रस्ता मस्त सोपा आहे काही काही ठिकाणी आम्ही अवघड शॉर्टकट मारले तेवढेच थ्रील….हिरवागार  गर्द झाडीनं वसलेला किल्ला पाऊस आणि धुके यांमधून डोकावणारा सूर्य मधूनच घसरणारे बूट…अशा वातावरणात आम्ही किल्ला सर केला तसा किल्ला फार काही मोठा नाही तसेच आमच्या जवळ किल्ल्याचा नकाशा होता मग बरेच स्पॉट शोधायला त्याची फार मदत झाली तसेच काही काही ठिकाणी शिवप्रेमींनी बोर्ड पण लावलेले आहेत भारी..स्थळ दर्शक असे बोर्ड सर्व किल्ल्यावर हवेत..

किल्ल्यावर दोन तळी आहेत महादेव मंदिराच्या मागे त्याला महादेव तलाव म्हणतात त्या दोन तलावांमधून एक मस्त रस्ता जात होता आम्ही ब्रीज सारखा वापरून तो तलाव क्रॉसिंग स्पर्धा केली.तलावाचे पाणी काटा किर्रर्र गार होते….पाय टाकल्यावर बर्फात पाय पडल्या सारखे झाले,एकमेकांना थोडे भिजवून मस्तीखोर मित्र शांत झाले….

किल्ल्याच्या वरून अम्बी व्हेली चे दर्शन होत होते..काय यार एवढ्या आत ही सिटी कशी वसवली असेल याचे आशर्य वाटल्या शिवाय राहत नाही….पण आता पैसे, किंमत, महाग ,सहारा,नेते ,ऐश हे शब्द आणि या सर्व गोष्टी इतक्या उंची वरून फार छोट्या वाटत होत्या… वाटेत एक लहान पटांगण आणि गणपती मंदिर पण लागते…५-६ तोफा आहेत किल्ल्यावर…

नकाशा :

कोरीगड नकाशा

किल्ल्यावर जाताना वाटेत पाण्याचे टाके व गुहा लागतात तेथे विश्रांती घेवून पुढे सरकलो…किल्ल्यावर माकडे पण फार आहेत पण बिचारी त्रास बीस देत नाहीत त्यांची मस्ती केमेरा बद्ध करण्यास काही प्राणीप्रेमी टपूनच बसलेले…धुक्यामुळे फोटो काढण्यास त्रास होत होता पण मधून सूर्याची उघडीप आल्यावर फोटो टिपून घेत होतो…

किल्ल्यावरून लहान लहान धबधबे वाहत होते..वाऱ्याने त्यांचे तुषार अंगाला थंडीची जाणीव करून देत होते असे सगळे वातावरण..

कोरीगड माथा

किल्ल्यावर मोठे पटांगण आहे तिथे मस्त स्टंटबाजी करून फोटो काढले आणि मग भूक लागल्यावर पिशव्या बाहेर आल्या आणि मग झडप मारून हाताला येईल ते खाल्ले…नंतर मोर्चा निघाला कोराई मातेच्या मंदिराकडे याच मंदिरामुळे गडाचे नाव कोरी गड पडले आहे या मंदिरासमोर ७ फुट उंचीची प्राचीनतम दीपमाला आहे..हे प्राचीन मंदिर आहे पण इथे रात्री आल्यास झोपण्याची पण सोय होते इतके ठीकठाक आहे.. देवीला वंदन करून आम्ही तोफा शोधायला निघालो नकाशावरून तोफा शोधल्या फोटो झाले आणि किल्ल्यावर वेढा मारून कमांडो परतीच्या मार्गाला लागले…

कोरीमाता मंदिर

.वाटेत मूड आला आणि लोणावळ्याच्या धबधब्याला अनपेक्षीत भेट दिली तिथे पायऱ्यांवर माणसांचा धबधबा इतका होता कि पाणी कोठे आहे ते शोधावे लागत होतो..आयडिया सी काही कमी न्हवती आम्ही त्या धबधब्याच्या मागे एक ओढा पकडला आणि त्यावरून वाट शोधूत एक आत धबधबा शोधला तिथे मनसोक्तपणे संध्याकाळचे अभ्यंगस्नान करून सिंथोल फ्रेश झालो…आणि बेस्ट ट्रीप ची सांगता करत परत पुण्याला निघालो…

…..परत तीच रस्त्याची नशा …धुक्याची मजा..पावसाची सर…कडक कटिंगचा घोट…गरम कांदा ,बटाटा भाजीवर चाप मारत सुसाट वेगाने परत मार्गस्थ झालो परत त्याच ट्रेफिक जाम वाटेवर आता काही वाटत न्हवते…. फ्रेशनेस अंगात दाबून भरला होता…प्रोब्लेम्सचा ज्वालामुखी काही वेळासाठी का होईना सुप्त पडला होता…त्याच गोष्टी,तीच तीच झाडे,पावसात भिजणारी गर्दी आता नवीन वाटत होती…

खरंच..कधी कधी रखरखत्या जमिनीला एखादी थंडगार वाऱ्याची झुळुकही फार काही देऊन जाते…..

-MJ [पुनर्प्रकाशित]